Ad will apear here
Next
स्वातंत्र्यवीर सावरकर, माधवराव बागल
‘जग ओळखतं ते सामर्थ्य. फक्त सामर्थ्य. समर्थाची जगात कधीही उपेक्षा होत नाही आणि दुर्बळाला उपेक्षेशिवाय दुसरं काही मिळत नाही,’ असं सांगून देश शक्तिमान करण्यासाठी ठराविक वयात मिलिटरी शिक्षण कंपल्सरी असावं, असे विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कथाकार माधवराव बागल यांचा २८ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
विनायक दामोदर सावरकर 

२८ मे १८८३ रोजी भगूरमध्ये (नाशिक) जन्मलेले विनायक दामोदर सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ या उपाधीने गौरविले जाणारे, ब्रिटिशांच्या छातीत धडकी भरवणारे प्रखर राष्ट्राभिमानी, हिंदुत्ववादी धुरीण, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रतिभावान कवी, नाटककार, लेखक, निबंधकार आणि तत्त्वज्ञ! ‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांना तंतोतंत लागू पडते असे हे ज्वलंत देशभक्त साहित्यिक! 

अंदमानात कठोरातली कठोर शिक्षा भोगत असतानाही कारागृहाच्या भिंतीवर त्यांनी कोरलेलं दहा हजार ओळींचं अप्रतिम काव्य, इंग्लंडमध्ये शिकायला गेलेले असताना त्यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला... ’ म्हणत ब्रायटनच्या समुद्राला केलेली आळवणी, लोकांना खडबडून जागं करणारे त्यांचे जळजळीत लेख, देशप्रेमाचा संदेश देणारी नाटकं, शिवाजी महाराजांवर त्यांनी रचलेलं ‘हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा’ हे स्फूर्तिगीत, असं चौफेर साहित्य त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दाखले देतं. 

त्यांना भाषाशुद्धीविषयी आणि लिपीशुद्धीविषयी आत्यंतिक प्रेम होतं आणि त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समाजप्रबोधन केलं. त्यांनी अनेक इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचं व्रत घेतलं होतं. दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्व, क्रमांक, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, चित्रपट, मध्यंतर, उपस्थित, प्रतिवृत्त, पर्यवेक्षक, विश्वस्त, त्वरित, गणसंख्या, स्तंभ, मूल्य, शुल्क, हुतात्मा, विशेषांक, निर्बंध, सार्वमत, नभोवाणी, अर्थसंकल्प, विधिमंडळ, क्रीडांगण, प्राचार्य, परीक्षक, शस्त्रसंधी, संचलन, सेवानिवृत्त असे त्यांनी दिलेले अनेक सुंदर शब्द आज वापरात रुळले आहेत.

ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीचे होते आणि त्याला अनुसरूनच त्यांनी समाजप्रबोधनात मोठं योगदान दिलं होतं. जुन्या अनिष्ट चालीरीतींना चिकटून न राहता काळाप्रमाणे बदल घडवायला हवेत, यासाठी त्यांनी प्रसंगी समाजाचा रोष पत्करून अनिष्ट रूढीपरंपरांवर प्रहार केले होते. 

त्यांनी रचलेलं स्वातंत्र्यदेवीचं स्तोत्र - 

‘जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||
राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेचि ।।२।।
मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।
हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||
जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे.. ’

‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ ही त्यांची शपथ आणि इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी स्थापन केलेली अभिनव भारत संघटना या दोन गोष्टी त्या काळात लोकांच्या अभिमानाचा आणि आदराचा विषय होत्या.

गाय उपयुक्त पशू आहे,’ असं ठामपणे सांगत त्यांनी, ‘माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. उत्क्रांतीवादाच्या तत्त्वानुसार, गाढवापेक्षा गाय श्रेष्ठ आहे, त्यामुळे गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गायीस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये’ - असं ठासून सांगितलं होतं. ‘जग ओळखतं ते सामर्थ्य. फक्त सामर्थ्य. समर्थाची जगात कधीही उपेक्षा होत नाही आणि दुर्बळाला उपेक्षेशिवाय दुसरं काही मिळत नाही’ - असं सांगून त्यांनी देश शक्तिमान करण्यासाठी, भारतात ठराविक वयात मिलिटरी शिक्षण कंपल्सरी असावं असे विचार मांडले होते; पण त्यांचे ते विचार त्या काळच्या सामान्य माणसाला झेपणारे नव्हते. अनेक अर्थांनी सावरकर हे काळाच्या पुढचा विचार करणारे होते.

माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, काळेपाणी, मोपल्याचे बंड, संगीत उत्तरक्रिया, संगीत उ:शाप, संगीत संन्यस्त खड्ग, कमला, गोमन्तक, सप्तर्षी, यांसारखी पुस्तकं आणि अनेक लेखसंग्रह असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी दादरमध्ये प्रायोपवेशन करून देहत्याग केला. 

(स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’ या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

माधवराव खंडेराव बागल 

२८ मे १८९५ रोजी कोल्हापुरात जन्मलेले माधवराव खंडेराव बागल हे कथाकार, पत्रकार, चित्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दलित चळवळीत मोठं योगदान दिलं होतं. 

जिव्हाळा, संस्थानी राजवट, संसार, कला आणि कलावंत, सत्याग्रहातून सहकार्याकडे, सुलभ समाजवाद, जीवनप्रवाह, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

सहा मार्च १९८६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
........................

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अनादि मी अनंत मी हे ध्वनिनाट्य ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे अन्य लेख वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.












स्वातंत्र्यवीरांबद्दलच्या वेबसाइट्स :
http://www.savarkarsmarak.com/ आणि http://www.savarkar.org/ या दोन वेबसाइट्सवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती असून, त्यांची पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ अशा सर्व साहित्याचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. सावकरांबद्दल यू-ट्यूबवर उपलब्ध असलेले व्हिडिओज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सावरकरांची ई-बुक्स मोफत
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.  



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZNJCM
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language